खट्याळ तिरपी रेलत-असावी सायंकाळी उन्हे
अन् आभाळी थवे उडावे आठवणींचे जुने
पडून गेला पाऊस-असावा, जणू सूर्याचा मित्र
सावल्यांस ही स्नान घडावे, चहूबाजूं पावित्र्य
बागडणारी अवती भवती मुक्त मधुरशी हवा
उन्हास हलके जोजविणारा अदृष मृदु चांदवा
समोर-असावा आवरलेला सारीपाट विस्तीर्ण
जीत हार चे सवालसुद्धा, सूर्याहूनही जीर्ण
मांडीवरती हक्क सांगण्या दो दशकांचा बोका
पुन्हा निघावा पाय, ढकलण्या अंगणातला झोका

सांग

बोलावंसं वाटत असेल तर सांग,
मलाही बरेचदा कळत नाही
सभ्यतेच्या पडद्यात लपून
खरं काही टळत नाही

तसे आपण सगळेच असतो
टेन्शन मध्ये, गडबडीत
बोलून काडी लावल्याशिवाय
भावनांचा कचरा जळत नाही

समोरचा मोकळा झाल्यावर
मगच आपण बोलू लागतो
आपणही सुरूवात केलेली चालेल
हेच बहुधा वळत नाही