देव

“दिसोदिशी पाट वाहे
दूध पंच-अमृताचा
सागरांच्या स्वामीयाला
अभिषेक रे कशाचा”

रात्र चढते तशाने
गर्दीपूर ओसरतो
जत्रेतला करामत्या
पुरोहिता विचारतो

“दोरीवर चालताना
हाती डोलकाठी वाटे
पाहणाऱ्या डोळ्यांतून
कधी मायबाप दाटे

गर्दीतून भेटे माझा
देव आनंदित होतो
टाळ्या शिट्यांमधे देव
मला आशीर्वाद देतो

देव हजार हातांचा
झोळीभर दान देतो
अंगोपांगी देव माझा
काट्या-शहाऱ्यांनी न्हातो”

Advertisements